मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात मंदी : शरद पवार
बारामती : देशा बाहेरचा काळा पैसा आणण्याच्या आश्वासनाबरोबरच नोटाबंदीचे धोरण फसले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे किमान पुढील वर्षभर तरी देशात मंदीचे वातावरण कायम राहील असे भाकित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले आहे.
आज बारामती येथे दि. मर्चंटस असोसिएशनच्या वतीने पाडव्यानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी मोदी सरकारच्या विविध धोरणांवर टीकास्त्र सोडले.देशातील मंदीला केंद्र सरकारचे चुकीचे निर्णय कारणीभुत असल्याचे सांगत आगामी निवडणूकीत सत्ता परिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत देशा बाहेरील काळा पैसा देशात आणून सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर भरण्याचे मोदींनी दाखविलेले स्वप्न दिवास्वप्न ठरले. त्यानंतर मोदींनी केलेली नोटाबंदी सपशेल फेल ठरली असे सांगत अर्थकारणातील निर्णय चुकल्यास त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेसह उद्योगांना आणि व्यापा-यांना भोगावे लागतात असे पवार म्हणाले.