मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही:सुधीर मुनगंटीवार

मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही:सुधीर मुनगंटीवार

मुंबई:अवनी तथा टी वन वाघिणीच्या मृत्युवरुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधक आणि शिवसेनेच्याही निशाण्यावर आहेत. मात्र वाघिणीच्या हत्येबद्दल सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या प्रक्रियेचे पालन करण्यात आले असल्याने मी राजीनामा देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. एका इंग्रजी सायं दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले.

कॉंग्रेस नेते संजय निरुपम, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदींनी मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत वनमंत्री म्हणाले की, मी माझ्या कार्यकालात तीन वाघांना ठार मारण्याचे आदेश दिले, असे मनेका यांचे म्हणणे आहे. पण त्यांना याबाबत काहीच माहिती नसल्याने त्या असा आरोप करत आहेत.

वन्यप्राण्यांना ठार मारण्याचे किंवा बेशुद्ध करण्याचे आदेश देण्याचा अधिकार मंत्र्याला नसतो. ते अधिकार राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांना असतात. माझ्या कार्यकालात फक्त एका वाघाला ठार करण्यात आले. मी चंद्रपूरचा आहे जिथे सर्वाधिक संख्येने वाघ आहेत. त्यामुळे तिथले जंगली जीवन आणि वास्तवाची मला चांगली जाणीव आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील वाघाला ठार करण्यासाठी याच शूटरला शफात अलीला बोलवण्यात आले. तेव्हा मनेका गांधी यांनी का आक्षेप घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला.

यवतमाळची जागा सिमेंट कंपनीला देण्याचा निर्णय आधीच्या सरकारचा होता. त्याबद्दल आम्हाला दोष देणे चुकीचे आहे. तसेच ती जागा वाघांच्या वास्तव्यापासून ६० किलोमीटर दूर आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ती जागा खाणींना देण्यासाठी वाघिणीला ठार मारले असे काही जण बोलत आहेत. पण त्यात काही तथ्य नाही, असेही वनमंत्री म्हणाले.

Previous articleशिवसेनेशी युती होणारच ! रावसाहेब दानवे यांचा दावा
Next articleआधी बनवा आणि मग नावासाठी भांडणे करा : नवाब मलिक