मराठा आरक्षणासह अवनी हत्या जलयुक्त शिवार मुद्दे गाजणार

मराठा आरक्षणासह अवनी हत्या जलयुक्त शिवार मुद्दे गाजणार

हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मुंबई : येत्या सोमवारपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम आरक्षण, शेतक-यांची कर्जमाफी,यवतमाळ मधिल अवनी या वाघिणीची हत्या, शिवस्मारक,जलयुक्त शिवार,दुष्काळ शेतक-यांच्या आत्महत्या आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.केवळ नऊ चालणारे हे अधिवेशन सरकारची परिक्षा घेणारे ठरणार असले तरी विरोधकांचा हल्ला परतवण्यासाठी सत्ताधारी सज्ज झाले आहेत.

येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबई विधानभवन येथे सुरू होत असून,गेल्या अनेक अधिवेशनात गाजणारा कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर येवू शकतो. कॅांग्रेस आणि राष्ट्रवादी कॅांग्रेस या विरोधकांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीपासुन वंचित राहिलेल्या शेतक-यांच्या मुद्यावरून सत्ताधा-यांना घेरण्याची तयारी केली आहे.कर्जमाफी देवूनही कर्जमाफी आणि नापिकीमुळे राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी यवतमाळ मधिल माधव रावते या शेतक-याने तर चिखलीतील आशा इंगळे या महिला शेतक-यांने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुद्द्यावर विरोधक सत्ताधा-यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात.मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला असून, मराठा समाजाने येत्या १ डिसेंबरला जल्लोषाला तयार राहावे असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी विरोधक या प्रकरणी कामकाजाच्या पहिल्या दिवसापासूनच हा मुद्दा लावून धरण्याची शक्यता आहे.यवतमाळ मधिल बोराटीच्या जंगलात अवनी या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचे प्रकरण या अधिवेशनात चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत .याच मुद्द्यावरून विरोधक सत्ताधा-यांना घेरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात.

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने धनगर समाजासह मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जावू शकतो.राज्य सरकारने राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहिर केला आहे. यावरूनही विरोधक आणि सत्ताधा-यांत चकमक होवू शकते.टंचाईची परिस्थिती असलेल्या अनेक तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जाईल अशी शक्यता आहे. या अधिवेशनात अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या शिवस्मारकाच्या उंचीवरून विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडू शकतात.तर नुकत्याच झालेल्या स्मारकाच्या पायभरणीच्या समारंभावेळी स्पीड बोटला अपघात होवून शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता शिद्धेश पवार याचा झालेला मृत्यु यावरूनही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार याजनेवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे.१४ हजार गावांची भूजल पातळी १ मीटरने घटली असल्याचा भूजल सर्व७ण विभागाने दिलेल्या अहवालावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

या मुद्द्याबरोबरच लग्नासाठी मुली पळवून आणू असे वादग्रस्त विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जावू शकते.गेल्या चार वर्षातील प्रत्येक अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विविध विभागांचा घोटाळा बाहेर काढून अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत. येत्या सोमवारपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात धनंजय मुंडे कोणता भ्रष्टाचार उघड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडे सत्ताधा-यांविरोधात अनेक मुद्दे असले तरी विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी सत्ताधारी सज्ज झाले आहेत.

Previous articleधनगर समाजाला आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन: प्रकाश शेंडगे
Next articleउपसमितीमध्ये राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश