त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही प्रत्यक्षात आणलं
मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेस राष्ट्रवादीला जोरदार टोला
पुणे: पुण्याचा, विकास करु, असे आश्वासन देत कॉंग्रेस राष्ट्रवादीने फक्त कागदावर प्रकल्प दाखवले. आम्ही चार वर्षांत ते प्रत्यक्षात आणले, असा जोरदार टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर नाव न घेता जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुण्याचा पंधरा वर्षांपासूनचा लटकलेला वाहतुकीचा प्रश्न भाजपने मेट्रोद्वारे सोडवला आहे. रिंग रोड, मेट्रो असे कोणतेही प्रकल्प नवीन नव्हते. पण कॉंग्रेस राष्ट्रवादीने ते फक्त कागदावर ठेवले. चोवीस तास पाणी योजनेवर त्यांनी फक्त चर्चा केली. स्मार्ट सिटीचा पैसाही त्यांना जनतेसाठी वापरायचा नव्हता, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. गरीब ते मध्यमवर्गीय आणि श्रीमंत ते फकिरांपर्यंत सर्वांच्या स्वप्नातील शहर म्हणून पुणे विकसित करण्याचे भाजपचे स्वप्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.