मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू : चंद्रकांत पाटील
जालना: मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी वकिलांची फौज उभी करू, असा निर्वाळा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिला.
मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा आरक्षणास अनुकूल असून त्यावर अभ्यास सुरू आहे. तो न्यायालयात टिकण्यासाठी वकिलांची फौज उभारू, असे पाटील म्हणाले. सावंगी येंथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पाटील आले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवून त्यात मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा केली जाईल आणि मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले. आयोगाच्या सकारात्मक अहवालाचा अभ्यास सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. मी केंद्र सरकारकडून एक लाख सहा हजार कोटीचा निधी आणून रस्त्याची कामे केली. विरोधकांनी निदान चांगल्या कामाचे तरी कौतुक करावे, असा टोला पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीला लगावला.