विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ?

विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार ?

मुंबई : उद्या सोमवारपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मराठा आरक्षणासह धनगर,मुस्लिम आरक्षणासह या मुद्द्यासह,दुष्काळ उपाययोजना करण्यात सरकारला आलेले अपयश या कारणास्तव चहापानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.याची अधिकृत घोषणा दुपारी करण्यात येणार आहे.

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची बैठक आज रविवारी दुपारी १२ वाजता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी होणार असून, या बैठकीत अधिवेशनात सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची रणनिती आखली जाईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता याच ठिकाणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यामध्येच मुखायमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याची अधिकृतपणे घोषणा केली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, गटनेते, ज्येष्ठ सदस्य यांना सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे चहापान व चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. चहापानापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक होईल, यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्री अधिवेशनासंदर्भात आपली भेमिका स्पष्ट करतील.

Previous articleमंत्री पंकजा मुंडेंमुळे गेवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरासाठी ८० लाखाचा निधी
Next article“ठग्ज ऑफ महाराष्ट्र” विरोधकांचा पोस्टरद्वारे सरकारवर हल्ला