दुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत जाहीर करा : विखे
मुंबई : मागील चार वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’ असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यानंतर भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी चौफेर हल्ला चढवला. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, सरकारने केलेली कोरड्या दुष्काळाची घोषणाही कोरडीच ठरली आहे. ही घोषणा करताना सरकारने कोणतीही भरीव मदत जाहीर केली नाही. दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यायचा असेल शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये, तर फळबागा व ऊसाला १ लाख रूपये हेक्टरी मदत जाहीर करावी;तसेच यंदाचे खरिपाचे १०० टक्के पीक कर्ज माफ करावे, दुष्काळी उपाययोजना अधिक शिथिल कराव्यात, आदी मागण्या त्यांनी लावून धरल्या.
सरकारला ४ वर्ष पूर्ण झाली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मोठा आव आणून शेतकऱ्यांच्या जीवनात कसे परिवर्तन आणले, याच्या वल्गना केल्या. पण यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात २३०० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हे प्रमाण अधिक वाढण्याची भीती आहे. या सरकारने कधी नव्हे ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर स्वतःचे सरण रचून आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आणली आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर भीषण वेळ ओढवलेली असताना, भाजप-शिवसेना सरकार मात्र शेती क्षेत्रात क्रांति आणल्याचा आव आणते, ही ठगबाजी असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.
सरकारला ४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून बुलडाणा जिल्ह्यातील मोहखेड हे गाव पाणीदार झाल्याची घोषणा केली होती. ही घोषणासुद्धा सरकारची ठगबागीच असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी मी मोहखेडला भेट दिली. पण ते गाव अजूनही कोरडे असून, तेथील नागरिकांनी यंदाची दिवाळी तेथील कोरड्या बंधाऱ्यात दिवे लावून साजरी केली, असे विखे पाटील यांनी सांगितले. सरकार जलयुक्त शिवारचे ढोल बडवत असले तरीही राज्यात टॅंकरची संख्या वाढली आहे. सरकारने १६ हजार गावे दुष्काळमुक्त जाहीर केली होती. त्या गावांमध्येही दुष्काळ पडल्याने सरकारची आणखी एक ठगबाजी जनतेसमोर उघडी पडल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला 1 डिसेंबरला जल्लोष करण्यास सांगितले आहे. मात्र 1 डिसेंबरला जल्लोष होणार की सरकारच्या नावाने शिमगा होणार, ते काळच ठरवेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत आदी समाजांच्या आरक्षणाच्या मागणीचा विषय ज्वलंत झाला आहे. परंतु, सरकार याबाबत संवेदनशील नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नुकताच शासनाला सादर झाला. हा अहवाल सादर करतेवेळी राज्य सरकारने आयोगावर दबावही आणला. पुढील १२ दिवसांत इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, कोणतीही कायदेशीर अडचण नसलेले आरक्षण मराठा समाजाला कसे मिळणार? हे अजून स्पष्ट झालेले नाही, असे सांगून सरकारने हा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात ठेवावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.
धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याचे स्वतः देवेंद्र फडणविस यांनीच जाहीर केले होते. त्याच धनगर समाडाचा ‘टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मागील महिन्याभरापासून सरकारकडे पडून आहे. पण धनगर समाजाच्या जल्लोषाचा मुहूर्त काय असेल? ते मुख्यमंत्र्यांनी अजून का जाहीर केले नाही?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजासोबतच मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. त्यातील शैक्षणिक आरक्षणावर न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. त्यांना आजवर या सरकारने जल्लोषाची संधी का दिली नाही? ही मुस्लीम समाजासोबत केलेली ठगबाजी नाही का? असे प्रश्न देखील विखे पाटील यांनी उपस्थित केले. लिंगायत समाजाच्या देखील काही मागण्या आहेत. या सर्व समाजांबाबत सरकारची भूमिका अजून स्पष्ट नसल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली. राममंदिराच्या नावाखाली ही नवी ठगबाजी आहे. दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर बांधण्याची वल्गना केली. त्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन राम मंदिराच्या बांधकामाचीच सुरूवात करणार, असे भासायला लागले होते. मात्र त्यांच्या अयोध्या दौऱ्यात कुठेही सुरूवात करणार, असे दिसून येत नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन ६ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर मागील ४ वर्षांपासून राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. पण अजून त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारता आलेले नाही. खरे तर बाळासाहेबांचे स्मारक ‘मातोश्री’वरच उभारणे संयुक्तिक ठरले असते. तसेही उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच ‘मातोश्री’ची नवी इमारत उभारली आहे. पण वडिलांच्या स्मारकासाठी आपल्या घराची जागा न देणारे उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या वल्गना करतात, ही ठगबाजीच नव्हे का? असा सवाल विखे पाटील यांनी यावेळी केला.
मागील २० वर्षे निरंकूश सत्ता असताना शिवसेनेला मुंबई उभी करता आली नाही. यांच्या नाकर्तेपणामुळे धडाधड इमारती कोसळून नागरिकांचा बळी जातो आहे. मुंबईत तब्बल २६ हजारांहून अधिक खड्ड्यांची नोंद झाल्याबद्दल ‘वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया बुक’कडून नुकतेच सुवर्ण पदक जाहीर करण्यात आले. पण या गोष्टींची दखल घ्यायला उद्धव ठाकरेंकडे वेळ नाही. भर दुष्काळात,अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैराश्याच्या वनवासात ढकलून ते अयोध्येला निघाले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.