आमदार अनिल गोटेंचा भाजपला दे धक्का !
धुळे पालिका निवडणुकीत स्वतंत्र चूल
धुळे: आमदार अनिल गोटे यांनी भाजपला अडचणीत आणण्याचे काम सुरूच ठेवले असून, नवीन पक्ष स्थापन केला असल्याची घोषणा त्यांनी आज केली. धुळे पालिकेच्या सर्व ७४ जागांवर गोटे यांचा पक्ष उमेदवार देणार असून त्यांच्या पत्नी हेमा गोटे या महापौरपदाच्या उमेदवार असतील. शिट्टी हे त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल.
बंडाचे हत्यार उपसलेल्या गोटे यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बंडाचे हत्यार म्यान केले होते. मात्र दगाफटका झाल्यास आपला मार्ग मोकळा असेल, असेही त्यांनी म्हटले होते. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी गोटे यांना एबी फॉर्म देण्याबाबत चर्चा केली. तेव्हा गोटे यांनी उमेदवारांची यादी मागितली आणि २८ जणांना उमेदवारी नाकारली. त्यावर अग्रवाल यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. परंतु दानवे किंवा महाजन यांचा फोन आला नसल्याने आपण निवडलेले उमेदवार लोकसंग्राम या पक्षाकडून निवडणूक लढवतील, असे गोटे यांनी सांगितले.
गोटे काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या निर्णयामुळे भाजपपुढील अडचणी वाढल्या आहेत. भाजपमध्ये नाराज असलेले गोटे यांनी काल राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्याने गोटे नरमले होते.