…तर सरकार बनणार नाही, पण मंदिर बनेल: उध्दव ठाकरे
आयोध्या : सध्या केंद्रातील सरकारकडून राम मंदिर उभारण्यात येणार नसेल तर पुढे सरकार बनणार नाही. परंतु राम मंदिर जरुर बनेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येत रामलल्लाचे सहपरिवार दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी हा इशारा दिला.
देशातील हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी मी आयोध्येत आलो असून, माझा कोणताही छुपा अजेंडा नाही,यापुढे सरकारने हिंदुंच्या भावनांशी खेळू नये. कित्येक वर्षे गेली तरी राम मंदिर उभे राहत नाही.
राम मंदिरासाठी अध्यादेश काढा, कायदा करा मात्र राम मंदिर लवकरात लवकर उभारा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.शिवसेनेने हिंदुत्वासाठी गेल्या निवडणूकीत साथ दिली. संविधानाच्या चौकटीतील प्रत्येक गोष्ट शक्य असेल त्याचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मग गेल्या चार वर्षात तुम्ही काय केले असा सवालही ठाकरे उपस्थित करत, हे होत नसेल तर जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
रामलल्लाच्या दर्शनाला जाताना मंदिरात चाललो की जेलमध्ये चाललो हे समजत नव्हते अशी खंत उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.निवडणुकीपूर्वी राम राम आणि आता आराम सुरु असल्याची टीकाही त्यांनी भाजपावर केली.