शरद पवारांचा ‘महात्मा फुले समता’पुरस्काराने होणार गौरव

शरद पवारांचा ‘महात्मा फुले समता’पुरस्काराने होणार गौरव

२८ नोव्हेंबर रोजी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते ‘समता पुरस्काराचे’ वितरण

नाशिक : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा यावर्षीचा ‘समता पुरस्कार’  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय खासदार शरद पवार यांना देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते बुधवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी दिली आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या कार्यक्रमासाठी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह,पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार समीर भुजबळ, आ.पंकज भुजबळ,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव,यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने‘महात्मा फुले समता पुरस्कार’सामाजिक, राजकीय, साहित्य,पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव,ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर,लेखिका अरुंधती रॉय,प्रा.डॉ.मा.गो.माळी, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

खासदार शरद पवार यांनी आपल्या कामातून महात्मा जोतीराव फुले यांचा वैचारिक वारसा विकसित केलेला असल्याने त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना समता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा खासदार शरद पवार यांना माता-पित्यांकडून मिळाला आहे. पुढे राज्यकर्ता म्हणून ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्या-त्या वेळी त्यांनी समतेच्या मार्गावर जावून दलित,आदिवासी,अल्पसंख्याक, ओबीसी  यांना न्याय देण्याचे काम केले आहे. मंडल आयोग, मराठा विद्यापीठ नामांतर, महिला धोरण यांसारख्या महत्वाच्या निर्णयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी कामगार, अल्पसंख्यांक आणि दिन-दलितांसाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले आहे.

या समता पुरस्कार सोहळ्यास सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व फुले प्रेमी, समता सैनिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी केले आहे.

Previous articleदुष्काळासाठी शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करा परंतु ठोस निर्णय घ्या-:धनंजय मुंडे
Next articleमराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?