नितेश राणेंनी आम्हाला शहाणपण शिकवू नये : विनायक मेटे

नितेश राणेंनी आम्हाला शहाणपण शिकवू नये : विनायक मेटे

बीड:शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याची टीका कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केल्यावर मेटे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. वैचारिक उंची नसलेल्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आम्ही काय केले, ते आपल्या वडीलांना विचारा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

मेटे हे मराठा आहेत का, याचीच शंका वाटते. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये, असे राणे यांनी म्हटले होते. राणेंच्या या टीकेला बीड मधील पत्रकार परिषदेत मेटे यांनी उत्तर दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २५ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत. मराठ्यांना आरक्षणाची गरज असल्याचे आयोगाने मान्य केले आहे. आरक्षणासाठी आम्ही आग्रही होतो. सध्या मात्र कुणी काहीही बोलत आहे. ज्यांची वैचारिक उंची नाही, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असा टोला त्यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला. आजपर्यंत त्यांनी समाजासाठी काय केले, हे त्यांना सांगता येणार नाही, अशी टीका मेटे यांनी केली. तसेच आम्ही काय केले ते आपल्या वडीलांना विचारा, असे सुनावले.

Previous articleविधिमंडळात कोंडी कायम! उद्यापासून कामकाज सुरळीत होणार ?
Next articleभाजप सत्तेसाठी रामाच्या नावाने अशांतता निर्माण करतेय : नवाब मलिक