नारायण राणेंना महाआघाडीत स्थान अशक्य: हुसेन दलवाई

नारायण राणेंना महाआघाडीत स्थान अशक्य: हुसेन दलवाई

चिपळूण: माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांना महाआघाडीत घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मनसुब्यांवर कॉंग्रेसने पाणी फेरले आहे. कॉंग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी राणे यांना महाआघाडीत स्थान देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीची कोकणात ताकद फारशी नाही. त्यामुळे नाराज नारायण राणेंना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देऊन या जागेवर दावा सांगण्याचा बेत राष्ट्रवादीचा आहे. पण कॉंग्रेसने त्यात मोडता घातला आहे. दलवाई म्हणाले की, हा प्रश्न विचारांच्या लढाईचा असून राष्ट्रवादीने कॉंग्रेसच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांनी जर राणेंसाठी आग्रह धरला तर रायगडची जागाही गमवावी लागेल, असा गर्भित इशारा दलवाईंनी दिला. रायगडची उमेदवारी अगोदरच सुनील तटकरेंना घोषित झाल्यासारखीच आहे.

दलवाईंनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिकांनी राणें विरोधात तीव्र भा़वना माझ्याकडे व्यक्त केल्या आहेत. जेव्हा राणे कॉंग्रेसमध्ये होते तेव्हाही त्यांनी कधी मूळ कॉंग्रेस कार्यकर्त्यांना बरोबर घेतले नाही. राणे कॉंग्रेसमध्ये होते म्हणून तर पक्षाला कोकणात मोठा झटका बसला होता. आता हुकूमशाही नेता कॉंग्रेसबाहेर गेल्याने कार्यकर्ता मोकळा श्वास घेत आहे, असे दलवाईंनी सांगितले.

भाजप आता राणेंना किंमत देत नाही. त्यामुळेच राणे राष्ट्रवादीला जवळ करू पाहत आहेत. राष्ट्रवादीच्या मदतीने ते सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचं स्वप्न पहात आहेत. पण कॉंग्रेस असे होऊ देणार नाही. कॉंग्रेस याविरोधात भूमिका घेईल, असे दलवाईंनी स्पष्ट पणे सांगितले. दलवाईंच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर मात्र मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यांना पुन्हा नव्या उमेदवाराची शोधाशोध करावी लागेल किंवा ही जागाच कॉंग्रेसला सोडावी लागणार आहे. कारण तटकरेंची जागा गमावणे परवडणारे नाही.

Previous articleभाजप सत्तेसाठी रामाच्या नावाने अशांतता निर्माण करतेय : नवाब मलिक
Next articleआरक्षण देण्यात विरोधकांनी अडथळा आणू नये : मुख्यमंत्री