उपाध्यक्षपद देवून शिवसेनेची नाराजी दुर करणार

उपाध्यक्षपद देवून शिवसेनेची नाराजी दुर करणार

मुंबई :  गेली चार वर्षे रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदासाठी शुक्रवारी ३० नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. शिवसेनेची नाराजी दुर करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला दिले जाणार आहे.या पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य विजय औटी यांच्या नावाची चर्चा आहे.

विधानसभाचे उपाध्यक्षपद मागील ४ वर्षांपासून रिक्त असून, सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा केला होता, परंतु हे पद भाजपने  रिक्त ठेवले होते. आगामी  निवडणुका लक्षात घेवून शिवसेनेची नाराजी दुर करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्षपद  भरले जाणार आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी प्रबळ दावेदार समजले जातात. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात केली. त्यानुसार आवश्यकता भासल्यास शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे गुरुवार  २८ नोव्हेंबर  रोजी सकाळी ११.४५ वाजेपर्यंत विधानमंडळाचे  प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करावयाची आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रधान सचिव यांच्या दालनात गुरुवार २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होईल.त्यानुसार उमेदवारी माघारी घ्यावयाची असल्यास त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे  शुक्रवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत स्वत: उमेदवाराने किंवा त्याच्या अनुमोदकाने आणून देणे आवश्यक आहे. निवडणुकीची  आवश्यकता भासल्यास शुक्रवार ३० नोव्हेंबर  रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता या वेळेत विधानसभा सभागृहात मतदान होईल. त्यानंतर दुपारी १.३० वाजता सभागृहाची बैठक पुन्हा सुरु होईल.

 

Previous articleदुष्काळाबाबत सरकारने शेतकऱ्यांना खरा शब्द द्यावा- धनंजय मुंडे
Next articleतीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना अनुदानाचा लाभ मिळणार