सरकारने लोकशाहीची थट्टा लावली आहे : अजित पवार

सरकारने लोकशाहीची थट्टा लावली आहे : अजित पवार

मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावर सभागृहामध्ये बोलायचे होते मात्र त्यावर बोलू दिले नाही.या सरकारने लोकशाहीची अक्षरश: थट्टा लावली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काॅग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायचे असतानाही सरकारने अंतिम आठवडा प्रस्ताव घेतलाच नाही याबाबतही तीव्र नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.दुष्काळ प्रश्नावर सरकारने योग्य असे उत्तर दिले नाही.सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी अक्षरश: भोपळा दिला आहे. आम्ही सभागृहामध्ये फळबागांसाठी १ लाख रुपये आणि इतर पिकांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मागत असताना मुख्यमंत्री मात्र नेहमीसारखा मागचा पाढा वाचत होते अशी जोरदार टिकाही अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

आरक्षणाबाबत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. सभागृहात मदत करायची ही आमची भूमिका होती. परंतु मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण दिले तर जल्लोष करा. पण या आरक्षणासाठी अनेक लोकांचा जीव गेला,अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले त्याचं सोयरसुतक या सरकारला नाही असा गंभीर आरोप करतानाच आरक्षणाचे विधेयक मंजुर झाल्यावर सरकारमधील मंत्री मात्र फेटे घालून जल्लोष करत होते याबाबत पवार यांनी संताप व्यक्त केला.

मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते आजही आंदोलन करत आहे. अनेक मुलांवर केसेस आहेत पण सरकारने त्यावर काही निर्णय घेतला नाही याबाबत चिंता व्यक्त करताना ज्या लोकांनी जीव गमावला त्यांना काही मदत या सरकारने केली नाही. समाजाच्या इतर अनेक मागण्या आहेत त्यावर मुख्यमंत्री काही बोलले नाहीत. मात्र भिमा-कोरेगाव प्रकरणात सरकार भिडेंवरचा गुन्हा मागे घेतं पण मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत नाही असा आरोपही  पवार यांनी यावेळी केला.

Previous articleओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिल्याबद्दल पंकजा मुंडेंनी केले मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन
Next articleमंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन