एस.सी-एस.टी उद्योजक विकास परिषदेचे आज उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

एस.सी-एस.टी उद्योजक विकास परिषदेचे आज उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत उद्योजक विकास परिषद व उत्पादनाचे प्रदर्शन दिनांक ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणार असून या परिषदेचे उद्घाटन आज सोमवार दि. ३ डिसेंबर रोजी, दुपारी अडीच वाजता उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. उद्योग व खनिकर्म राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

केंद्र शासनाने अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांच्या विकासासाठी शासनाच्या खरेदी धोरणात ४ टक्के आरक्षण व प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर केलेले असून, या धोरणाची National SC-ST HUB (NSSH) अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असते. शासनाच्या उद्योग विभागामार्फत NSSH अंतर्गत असलेले अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांचा ४ टक्के सहभाग राहण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी चर्चासत्रे, परिषदा, प्रदर्शने आयोजित करण्यात येतात. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लघु उद्योजकांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हब (NSSH) उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने तीन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.

या परिषदेसाठी राज्यातील विविध औद्योगिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. राज्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील ५०० उद्योजक सहभागी होणार असून, परिषदेमध्ये विविध विषयावरील मार्गदर्शन, चर्चासत्रे तसेच सुमारे १५० उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. प्रदर्शनामधील केंद्र शासनाचे विविध सार्वजनिक उपक्रम,कंपन्या यांच्याकडे पुरवठा करण्यासाठी असलेल्या संधीचे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण असणार आहे. सहभागी उद्योजकांसाठी अभियांत्रिकी, बंदरे व शिपिंग, बांधकाम क्षेत्रातील संधी, राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील संधी, तेल, इंधन व रसायन क्षेत्रातील खरेदीच्या संधी तसेच खासगी क्षेत्रातील खरेदीच्या संधीबाबत तज्ञ वक्त्यांची चर्चासत्रे आयोजित करण्यात आलेली आहेत.

एन.एस.आय.सी., कोकण रेल्वे, पश्चिम व मध्य रेल्वे, आय.आर.सी.टी.सी., भेल,माझगाव डॉक, महाजेनको, महाराष्ट्र राज्य परिवहनमहामंडळ, एचपीसीएल,ओएनजीसी, आरसीएफ, एमटीडीसी,एचएएल, डीआरडीओ, ॲम्युनिशन फॅक्टरी या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संस्था या परिषदेमध्ये सहभागी होणार असून, टाटा मोटर्स, महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, फियाट, शिंडलर, टाटा कमिन्स, हेअर, बडवे इंजिनिअरींग आदी खासगी क्षेत्रातील मोठे उद्योगदेखील सहभागी होणार आहेत. निर्यातवृद्धी व कार्यपध्दतीबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन केलेले असून,  वित्तीय सहाय्यासाठी विविध राष्ट्रीय व खासगी बँका देखील सहभागी होणार आहेत.

दिनांक ५ डिसेंबर  रेाजी सहभागी उद्योजकांना नवीन तंत्रज्ञान व अधिक माहितीकरिता महिंद्रा अँड महिंद्रा लि.,कांदिवली, इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या ठिकाणी भेटी व चर्चा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  या परिषदेमध्ये सहभाग नोंदविण्याकरिता ऑनलाईन नोंदणीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विनाशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण परिषदेस मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन विकास आयुक्त (उद्योग) डॉ.हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

Previous articleकिती काळ लाचारसारखं जगणार ; उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी ठणकावलं
Next articleभाजपच्या राजवटीत संविधान धोक्यात :कॉंग्रेसचा गंभीर आरोप