महाराष्ट्रात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक?

महाराष्ट्रात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक?

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील भाजप सरकार विधानसभा विसर्जित करून दोन्ही निवडणूका एकत्रित घेवू शकते. यामुळे मोठीच खळबळ उडाली आहे. दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्यास भाजप सोडला तर शिवसेनेसह सर्वच पक्षांचा विरोध आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल ऑक्टोंबर २०१९ मध्ये संपणार आहे. भाजप सत्तेत असल्याने विधानसभा मुदतपूर्व विसर्जित करून निवडणूक घेण्याचा विचार भाजप करू शकतो. आंध्रप्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश राज्यांच्या विधानसभांचाही कार्यकाल संपत असल्याने तेथेही लोकसभेसोबत निवडणूक होऊ शकते.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर केल्यामुळे राज्यातील भाजपला निवडणूक जिंकू, अशी खात्री वाटत आहे. त्यातच सेनेनेही आपली ताठर भूमिका सोडून मवाळ केल्याने युती होण्याची शक्यता वाढली आहे. राज्यात युतीला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे भाजपला वाटत असल्याने भाजप दोन्ही निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा, विचार करू शकतो. अर्थात दोन्ही निवडणुका एकत्रितपणे घेण्यास कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तीव्र विरोध आहे. आगामी काळात राज्यात नाट्यपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकत्रितपणे घेण्याची कल्पना मांडली होती. मध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात दोन्ही निवडणुका एकत्र होणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले होते. पण ते घूमजाव करू शकतात.

Previous articleभाजपच्या राजवटीत संविधान धोक्यात :कॉंग्रेसचा गंभीर आरोप
Next articleदुपारी युतीचा नगारा सायंकाळी स्वबळाचा नारा !