नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले ?

नारायण राणेंची भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले ?

सावंतवाडी: राज्यातील राजकारणाची भविष्यातील दिशा दाखवणाऱ्या दोन राजकीय घटना आज घडल्या. भाजपवर सातत्यानं टीकेची धार धरणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत वाशिम येथील कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले. युतीचे संकेत यातून मिळत असतानाच तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुदाम वाकडी वाट करून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. वीस मिनिटे ही भेट सुरू होती. पवार-राणे भेटीमुळे राज्यात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे.

या भेटी नंतर पवार यांनी माध्यमांशी बोलताना राणे आणि माझ्यात बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही. माध्यमांना सांगण्यासारखे काहीही नाही. राणेंचा फोन आला म्हणून भेटायला गेलो, असे सांगितले. ही भेट राजकीय नाही, असंही ते म्हणाले.

पवार असे म्हणत असले तरी ही भेट राजकीयच होती आणि राणे यांना राष्ट्रवादीकडे ओढण्याचा पवारांचा प्रयत्न असावा, या चर्चांना उधाण आलं आहे. राणे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले असले तरी नाराज आहेत. शिवाय भाजप सेना युतीचे संकेत मिळत असल्यानं ते अस्वस्थ आहेत. युती झाल्यास राणे नको, हीच पहिली अट सेना घालणार, हेही राणेंना माहीत आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

राष्ट्रवादीलाही सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंसारखा ताकदवान उमेदवार हवा आहे. कॉंग्रेसची भूमिका मात्र यात निर्णायक ठरणार आहे.

Previous articleआरक्षण टिकवण्याची लढाई आता सुरू:चंद्रकांत पाटील
Next articleशिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीला सुरूवात!