दुष्काळात सापडलेल्या वधूपित्यांना ‘लेक’ देणार मायेचा आधार

दुष्काळात सापडलेल्या वधूपित्यांना ‘लेक’ देणार मायेचा आधार

परळी : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्व सामान्य जनतेची आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आता त्यांच्या मुला-मुलींच्या विवाहाची चिंता दूर करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पुढील महिन्यात २३ जानेवारी रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन त्यांनी केले असून वधू पित्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.

जिल्हयात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे खरीप व रब्बीची पीके हातची गेली आहेत, नदी, तलाव कोरडेठाक पडल्याने पाण्याचेही मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे तसेच हाताला काम नसल्याने पैशाची मोठी अडचण आहे. अशा भयानक दुष्काळाच्या परिस्थितीत सर्व सामान्य शेतकरी, शेतमजूरांना आपल्या मुला-मुलींचे लग्न कसे करावेत, हा प्रश्न सतत भेडसावत आहे. मात्र जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची ही चिंता दूर करून बिकट परिस्थितीत त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. पुढील महिन्यात होणा-या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांना हा आधार मिळणार आहे.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबाराचे आयोजन केले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच आता पुढील महिन्यात म्हणजे २३ जानेवारी रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वधू वरांचे कपडे, सोन्याचे मनी मंगळसुत्र, संसारोपयोगी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार आहे.

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी विवाहेच्छू वधू वरांना किंवा त्यांच्या पालकांना ५ डिसेंबर २०१८ ते ५ जानेवारी २०१९ दरम्यान नांव नोंदणी करता येणार आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी व (अरूणोदय मार्केट), अंबाजोगाई (डाॅ. आंबेडकर चौक) येथील संपर्क कार्यालयात ही नोंदणी सुरू असणार आहे. विवाहाची नोंदणी पुर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, मात्र नोंदणीसाठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, वधू व वरांचे पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी दोन फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleसुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे तर उत्तम सेल्फीपटु :विजय शिवतारे यांचा टोला
Next articleलाख’मोलाची बाळासाहेब ठाकरे स्मृती एकांकिका स्पर्धा ११ ते २० जानेवारी रोजी ठाण्यात