राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत असो की पवारांसोबत एकत्रितपणे केलेली विमान प्रवास असो, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाढती जवळीक नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यापूर्वी अनेकदा कॉंग्रेसचा विरोध डावलूनही राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना आपल्यीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांसमोर बोलवून आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यामागे राष्ट्रवादीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज ठाकरे यांनी कांदिवलीत उत्तर भारतीयांसमोर आपली भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी याअगोदर उत्तर भारतीयांविरूद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे अमराठी भाषकांच्या रोषाचा फटका बसू शकतो, यामुळे कॉंग्रेस चिंतित आहे. म्हणूनच राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांना चुचकारण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला, असे बोलले जाते. राज ठाकरेंना आपल्याकडे वळवण्याचाच हा प्रयत्न होता.
हा कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांपैकी एक प्रमुख अरूण मिश्रा हे राष्ट्रवादीच्या उत्तर भारतीय युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील श्रीकांत मिश्रा हे मुंबई राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष असून तेही कार्यक्रमाला उपस्थित होते. दोघेही पितापुत्र राज ठाकरे यांच्यासमवेत मंचावर होते.यावरून भाजप-सेनेशी टक्कर देण्यासाठी महाआघाडीत मन सेने सहभागी व्हावे, ही राष्ट्रवादीची इच्छा असल्याच्या शंकेस बळकटीच मिळते.कॉंग्रेसचा मात्र राज ठाकरेंना यासाठी विरोध आहे की उत्तर भारतीय मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

अर्थातच अधिकृतपणे राष्ट्रवादी आणि मनसे या दोघांनीही या सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादीचे सचिन अहिर म्हणाले की, भाजपविरोध या पलिकडे मनसे आणि राष्ट्रवादीत काहीच साम्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासूनच भाजपविरोधी आहोत. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने कांदिवलीतील कार्यक्रमाचा फार मोठा राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे म्हटले.

Previous articleबाबासाहेबांचे समतेचे स्वप्न साकार करणार :मुख्यमंत्री
Next articleशहरांच्या नामांतरांपेक्षा अयोध्येत राममंदिर होणे महत्वाचे: उद्धव ठाकरे