विकासात नाशिकची झालेली पीछेहाट ही चिंतेची बाब- छगन भुजबळ

विकासात नाशिकची झालेली पीछेहाट ही चिंतेची बाब- छगन भुजबळ

नाशिक : शहरी आघाडीवर जागतिक विचारसंहिता असलेल्या स्मार्ट सिटी मेयर्स फाउंडेशनच्या नोव्हेंबर २०११ मधील सर्वेक्षणानुसार वाईन कॅपिटल ऑफ इंडिया देशात चौथ्या क्रमांकावर तर जगात सोळाव्या स्थानी होते. मात्र आता ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार नाशिकची जागा आता नागपूर शहराने पटकावली आहे. नागपूरचा विकास झाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. मात्र नाशिकच्या विकासदरात झालेली घसरण ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

एकेकाळी विकासाची गंगा वाहणाऱ्या आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या नाशिक शहराला दृष्ट लागली असून गेल्या चार वर्षापासून नाशिक शहराच्या विकासाचा वेग इतका मंदावला आहे, की पुढील काळात नाशिककरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची चिन्ह दिसत आहे. ‘कुठे नेऊन ठेवलं नाशिक’ अस म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.

एकंदरीत दळणवळणाच्या अनुषंगाने यापूर्वी केलेल्या पायाभूत सुविधांचया कामांच्या देखभालीकडे केलेले दुर्लक्ष,नाशिक शहराच्या औद्योगीकरणाचा मंदावलेला वेग, कृषी प्रक्रिया उद्योगाला न मिळालेली चालना, जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीकडे सत्ताधाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष त्यामुळे नाशिकची पीछेहाट झाली आहे.

आघाडी सरकारच्या काळात नाशिक शहर व जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक मोठमोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प साकारण्यात आले. त्या प्रकल्पांची सदया काय परिस्थिती आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिककमधील पर्यटन वृद्धीसाठी मी पाठपुरावा करून निर्माण केलेले गंगापूर येथील मेगा पर्यटन संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्लब, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा संकुल, कलाग्राम, अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट यासह पर्यटनाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प २०१४ पर्यंत साकारण्यात आले. मात्र सद्या हे प्रकल्प केवळ धूळखात पडले आहे. न भूतो न भविष्यती असे हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना सुरु करण्यासाठी सत्ताधारी सरकारला वेळ नाही.

नाशिक जिल्ह्यातील क्रीडा प्रबोधिनी व बोट क्लबमधील बोटी त्या खात्याचे मंत्री यांनी आपल्याकडे पळवून नेण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणावर उभारलेल्या बोट क्लबसाठी अमेरिकेतुन आणलेल्या काही बोटी पर्यटनमंत्र्यांच्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे पळविण्यात आल्या आहे.मी अडचणीत होतो त्या काळात नाशिकचे प्रकल्प पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला गेला.

नाशिकमध्ये पाणी नसल्याचे कारण देऊन दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉरच्या पहिल्या टप्प्यातून नाशिकला वगळले. ‘वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक’ हे वर्षानुवर्षांपासून नाशिकला असणारे कार्यालय माहे डिसेंबर २०१५ मध्ये नागपूरला पळवले गेले. एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचा आणि येथील प्रस्तावित ६६० मेगावॅटचा प्रकल्प स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न, एकलहरे येथील स्थापत्य विभागाचे कार्यालय पारस (भुसावळ) येथे–माहे आक्टोंबर २०१६ मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. नाशिककरांची मागणी असलेल्या नायपर संस्थेसाठी नाशिकला टाळून नागपूरला प्राधान्य देण्यात आले. चितेगाव ता.निफाड येथे असलेले NHRDF चे मुख्यालय व संशोधन केंद्र – माहे मे २०१६ मध्ये दिल्लीला हलविण्यात आले. नाशिक जिल्ह्याचा कोकण विभागात समावेश (कल्याण जि.ठाणे मुख्यालय) करून माहे नोव्हेंबर २०१६ महावितरणचे मुख्यालय स्थलांतरीत करण्यात आले.

मी उपमुख्यमंत्री असतांना सन २००९ मध्ये नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नाशिक विकास पॅकेज मंजूर करून घेतले होते. त्या पॅकेज मधील कृषी विभागाचे टर्मिनल मार्केट,दादासाहेब फाळके चित्रनगरी,सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नाशिक कॅम्पस, मेगा फूड पार्क अंतर्गत वडगाव पिंगळा ता.सिन्नर येथील अन्नप्रक्रिया उद्योग यासह अनेक महत्वकांक्षी प्रकल्प रखडले आहेत.

नाशिकच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीज दरात सवलत देण्यात आली. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील कामगार व रोजगारावर बसला आहे. अशा अनेक कारणांमुळे नाशिक शहर व जिल्ह्याचा विकास खुंटल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

Previous articleवाचा आणि पहा – मराठा समाजाचे जात प्रमाणपत्र कसे असेल : जीआर जारी
Next articleशरद पवारांनी असा पुरवला नातीचा हट्ट