धुळे महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता
मुंबई: आयात माल, गुंडांना उमेदवारी या आरोपांमुळे राज्यभर गाजलेल्या धुळे पालिकेचे निकाल जाहीर झाले असून भाजपने येथे तब्बल ५० जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर नगर महापालिकेत मात्र त्रिशंकू अवस्था आहे. आमदार अनिल गोटे यांनी भाजपचे वरिष्ठांसह थेट मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप केल्यामुळेही धुळ्याची निवडणूक गाजली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि मंत्री जयकुमार रावल यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.
भाजपने ५० जागांवर विजय मिळवल्याने एकहाती सत्ता येणार आहे. कॉंग्रेसने ५ तर राष्ट्रवादीने ९ जागा जिंकल्या. शिवसेना, समाजवादी पक्ष यांना फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे प्रथमच एमआयएमचा चंचुप्रवेश धुळ्यात झाला असून त्यांचे दोन सदस्य निवडून आले आहेत. अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली. भाजपने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. नंतर कॉंग्रेस राष्ट्रवादीने काहीशी टक्कर दिली. नंतर मात्र भाजप खूप पुढे निघून गेला.
दरम्यान भाजप विजयी झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि गोटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गोटे यांनी भाजपने ईव्हीएम यंत्रात घोटाळा करून विजय मिळवल्याचा आरोप भाजपवर केला. महाजन यांनी अनिल गोटे यांना मतदारांनी नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मात्र या निवडणुकीत धूळधाण उडाली आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.