२०१९ मध्ये हाच कल राहील :पृथ्वीराज चव्हाण यांचे भाकित
मुंबई:पाच राज्यांचे कल जाहीर होत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१९ मध्ये हाच कल राहील, असे भाकित वर्तवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी खोटी आश्वासने दिली त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, हे यावरून दिसले आहे. तीन राज्ये कॉंग्रेसकडे येतील आणि हे कॉंग्रेसचे यश आहे. मोदी यांनी जी खटल्यांची दहशत घातली होती, त्याविरोधात हा कौल आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कीमोर्तब झाले आहे, असेही चव्हाण म्हणाले.
भाजपच्या राज्यात सामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी मोदींशिवाय पर्याय नाही, या दडपणाखाली होते. तेही आता मोकळे होऊन मतदान करत आहे, असे त्यांनी सांगितले.
२०१९ ची निवडणूक जिंकायची असेल तर आघाडी करण्यापासून पर्यायच नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शिवसेनेनेही आता हरणाऱ्या भाजपबरोबर जायचे का याचा फेरविचार करावा, असा सल्लाही दिला. शिवसेनेला निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.तेलंगणात कॉंग्रेस टीडीपीला मिळालेल्या दारूण अपयशाबद्दल चव्हाण यांनी आत्मपरीक्षण करावे लागेल, असे उत्तर दिले. मात्र छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसने निर्विवाद विजय मिळवल्याचा उल्लेखही केला.