भाजपच्या जुलमी राजवटीला चपराक : राज ठाकरे
मुंबई:पाच राज्यांमधील निवडणूक निकालांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी यांच्याबाबत होणारच होते, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या जुलमी राजवटीला ही जनतेने दिलेली चपराक आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
पाच राज्यांतील आलेले निकाल कॉंग्रेसच्या बाजूने आहेत. भाजपची वागणूक जशी होती त्यामुळे असे होणारच होते. पाच राज्यांतील जनतेने चांगला पायंडा पाडला आहे. तेथील जनतेचे अभिनंदन मी करतो, असे राज ठाकरे म्हणाले.
राम मंदिराचा मुद्दा भाजपने निवडणुकीत काढला होता. त्याबाबत विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, देशात राम मंदिराचे वातावरणच नव्हते. त्याचा परिणाम होणारच नव्हता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला जनतेने दिलेला हा कौल आहे, हे मान्यच करावे लागेल, असेही राज म्हणाले. राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे. राज ठाकरे यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले. गुजरातेतूनच हा पायंडा सुरू झाला,म्हणून गुजराती जनतेचे अभिनंदन करतो , असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी कौतुक केल्यामुळे कॉंग्रेसशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.