उगाच हवेत उडणारे जमिनीवर कोसळले : उध्दव ठाकरे

उगाच हवेत उडणारे जमिनीवर कोसळले : उध्दव ठाकरे

मुंबई: मध्यप्रदेश, राजस्थानसह चार राज्यांत भाजपचा पराभव झाल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला डिवचण्याची संधी घेतली आहे. सामना संपादकीयात शिवसेनेने उगाच जास्त उडणारे कोसळले, असे म्हणतानाच कॉंग्रेसमुक्त भारताचे जे स्वप्न मोदी आणि शहा यांनी पाहिले त्याची धूळधाण भाजपशासित राज्यांतच उडाली, असा टोला लगावला आहे. उगाच हवेत उडणारे जमिनीवर कोसळले, अशी टीका सेनेने केली आहे.

हिंदी पट्ट्यातील तिन्ही राज्ये भाजपकडून निसटली. तेलंगणातही भाजप कॉंग्रेसच्या खाली आहे. पर्याय कोण याचा विचार न करता जनतेने नको त्यांना उखडले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत असे म्हणत शिवसेनेने भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भाजपला एकाही राज्याचे गणित सोडवता आले नाही आणि मोदी-शहा जेमतेम काठावर तर राहुल गांधी मेरिटमध्ये चमकल्याचा निकाल लागला आहे, असा टोला संपादकीयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मोदी यांचा उदय ज्या राज्यात झाला तेथेच भाजपची चाके रुतली आहेत. मोदी पंतप्रधान असताना याच चार राज्यांत भाजपला जबर फटका बसला, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपने आधी मित्रांना गमावले आणि आता महत्वाची राज्ये गमावली, असे ठाकरे यांनी म्हटले.

थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही, असा टोमणा भाजपला मारतानाच शेतकऱ्यांमधील संतापामुळेच पराभव झाल्याचे सांगितले आहे. मध्यप्रदेशात।तर शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. शिवराजसिंह चौहान यांनी नंत माफी मागितली पण शेतकऱ्यांनी मतपेटीतून सूड उगवला, असे ठाकरे यांनी संपादकीयात म्हटले आहे

नोटबंदीमुळे लोकांचे रोजगार गेले, महागाई वाढली तरीही पंतप्रधान देशविदेशात उडत राहिले. मोदींनी भावनिक विषयांवर पोरकट विधाने केल्याचीही टीका शिवसेनेने केली आहे. राममंदिराचे वचनही पाळले नाही. राज्य चालवणे म्हणजे पेढी चालवणे आणि त्या पेढीखालच्या पैशातून निवडणुका लढवणे, हे सर्व असेच राहील या भ्रमात असलेल्यांना जनतेनेच धक्का दिला, अशी जोरदार टोलेबाजी ठाकरे यांनी केली आहे.
 

Previous articleविकासाचा मुद्दा सोडल्यानेच भाजपचा पराभव : खा संजय काकडे
Next articleपंकजा मुंडेंच्या हस्ते गोपीनाथ गडावर आरोग्य यज्ञाला सुरूवात