माजी खासदार निवेदिता माने उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

माजी खासदार निवेदिता माने उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

कोल्हापूर: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी जवळीक साधल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घ्यायचे ठरवले आहे. उद्या त्या आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा माने गटाचा गड मानला जातो. परंतु माने गटाला राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींनी सातत्याने डावलले आहे, अशी माने गटाची भावना झाली आहे. त्यातच यंदा लोकसभेसाठी हातकणंगलेची जागा पवार यांनी शेट्टींना बहाल केली आहे. यामुळे निवेदिता माने यांनी राष्ट्रवाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पुत्र धैर्यशील यांनी अगोदरच शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस धैर्यशील माने यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानपरिषद सदस्यत्व देण्याचा शब्द दिला होता. तोही पाळला नाही.यामुळे माने गट कमालीचा नाराज झाला आहे.

निवेदिता माने यांच्या सून वेदांतिका माने यांच्या रूकडी जिल्हा परिषद संघातील पराभवासाठी राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने जोरदार प्रयत्न केल्याने तर माने गट चांगलाच बिथरला आहे. शेट्टी आणि माने गट यांच्यातील वैर जुनेच आहे. पण निष्ठावंत माने गटाला डावलून पवारांनी शेट्टीना जवळ केल्याने निवेदिता माने यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जाते.

Previous articleडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीनः सावंत
Next articleनरेंद्र मोदींनी दुष्काळी दौरा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी: विखे पाटील