मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा
नाशिक: मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दहा वर्षांनंतर परप्रांतियांविरोधातील एका प्रकरणात आज जामिन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२००८ मधील हे प्रकरण आहे. परप्रांतियांविरोधात रेल्वे भरतीच्या वेळेस मनसेने मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी बाहेरून आलेल्या उमेदवारांना मनसेने बेदम मारहाण केली होती. त्याच आंदोलनादरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरील साईप्लाझा हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्या खटल्यात राज ठाकरे यांनाही आरोपी करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
इगतपुरी न्यायालयात या प्रकरणी खटला सुरू होता आणि राज वारंवार समन्स पाठवूनही हजर होत नव्हते. अखेर राज ठाकरे यांनी आज स्वत:हून हजेरी लावली. राज न्यायालयात आले तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
राज ठाकरे आजपासून पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून या काळात ते मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यात राज ठाकरे यांचे काम आहे. परंतु नंतर त्यांची महापालिकेतील सत्ता गेली. पुन्हा मनसेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज ठाकरे यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे.