…..गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी सभागृह झाले भावूक
पुणे : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पश्चात माझं जीवन, माझं स्वप्न हे आता माझं राहिलं नसून ते तुमच्यासाठी समर्पित झालं आहे. त्यांनी जनतेसाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पुर्ण करणं हेच आता माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय व कर्तव्य आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, त्यांच्याविषयी पिता व नेता या दोन्ही भूमिकेतून त्यांचे आयुष्यातील प्रसंग ऐकतांना सभागृह अक्षरशः भावूक झाले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त रविवारी पिंपरी चिंचवड जयंती समितीच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘आठवणीतील मुंडे साहेब’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, आ. लक्ष्मण जगताप, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, व्याख्याते अशोक बांगर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते, पोलीस आयुक्त पद्मनाभन आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे यांनी मुंडे साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेबांशी माझं नातं एक कन्या व पिता याबरोबरच ते नेता, सहकारी व मित्राचे होते. आयुष्यातील त्यांचा संघर्ष व त्यांना झालेल्या यातना मी जवळून पाहिल्या. एवढा संघर्ष झाला तरी त्यांनी कधी कुणाविषयी राग, द्वेष केला नाही की अहंकार त्यांच्या मनाला शिवला नाही. राजकारणात अनेकांना त्यांनी घडविले, अनेकांनी धोकेही दिले पण तरीही ते त्यांचेशी प्रेमानेच वागले. सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या सुख, दुःखात समरस होणा-या या नेत्याने सर्वांना आपलसं केलं होतं असे त्या म्हणाल्या.
मुंडे साहेबांची अचानक एक्झिट ही सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. त्यांच्या जाण्याने अनेक लोक दुःखी झाले, निराश होवून बसले होते. हे मला सहन होत नव्हते. त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी व त्यांचे स्वप्न जागृत करण्यासाठी मी संघर्षयात्रा काढली असे सांगून सत्तेच्या विरोधात ज्यांनी सातत्याने संघर्ष केला पण जनतेसाठी काहीतरी करण्याची वेळ आली त्यावेळी ते अचानक निघून गेले, त्यामुळे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. निःस्वार्थपणाने प्रेम करणा-या लोकांसाठी मला कांहीच करता आले नाही ही खंत त्यांना सतत वाटायची. त्यांना सत्तेच्या माध्यमातून मला विकास द्यायचाय असे ते नेहमी म्हणत. म्हणूनच शेतक-यांना पाणी, रस्ते, महिलांचे सक्षमीकरण, मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी मी पुढाकार घेतला असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पुर्ण हेच आता माझं आयुष्य असल्याचेही त्या म्हणाल्या.
पिता व नेता या दोन्ही भूमिकेतून मला त्यांच्याकडून बरचं कांही शिकायला मिळालं. आज त्यांच्या पश्चात राजकारणात मला अनेक कठीण प्रसंग व संघर्षाला सामोरे जावे लागले पण त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवली की मला मोठा आधार मिळतो. आजही मार्गदर्शकाच्या रूपात कठीण प्रसंगात ते मार्ग दाखवत असतात हे वेळोवेळी मला जाणवले आहे. मुंडे साहेबांची लोकप्रियता अफाट आहे, उलट ती दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे त्यांच्या १२ डिसेंबरला जयंती ऐवजी वाढदिवसच साजरा होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री बापट, महादेव जानकर, गोविंदराव केंद्रे यांनीही मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.