सरकारची घरवापसी करण्याची वेळ आली : छगन भुजबळ

सरकारची घरवापसी करण्याची वेळ आली : छगन भुजबळ

वैजापूर : जनतेला अन्न, वस्त्र, निवारा शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा आणि विकास गरजेचा असतांना वेगवेगळे विषय घुसवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारच्या सर्व योजना फेल झाल्या असून विकासाच्या सर्वच पातळ्यांवर सरकार फेल झाले आहे अशी टीका करून सद्याच्या सरकारच्या घरवापसी करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैजापूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित समता मेळावा व बहुजन हक्क परिषदेच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचे दहन केले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेली पाच हजार वर्ष मनुस्मृती हा अलिखित कायदा देशात होता. महिलांची परिस्थिती या काळात अतिशूद्र परिस्थिती होती. यावेळी महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन शिक्षणाचे कार्य सुरू केले. त्यांना फातिमाबी शेख यांनी देखील मदत केली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुग्रंथ जाळून पुढे राज्यघटना निर्माण केली. सर्वांना समतेचा अधिकार मिळवून दिला.

या देशात मनुवाद पुन्हा एकदा डोके वर काढत असून या मनुवादी वृत्तीला संपविण्याची गरज आहे. बहुजन युवकांना दिशाहीन करण्याचे काम मनूग्रंथाच्या माध्यमातून संभाजी भिडे करत असल्याची टीका त्यांनी केली.मनुवाद्याकडून कायद्यांचा संकोच निर्माण केला जात आहे.संविधान दिल्लीत जाळले त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही मात्र मनू ग्रंथ जाळण्यावर कारवाई केली जाते ही शोकांतिका आहे. देशात हनुमानाची जात ठरविण्याचे प्रकार होत आहे. हळू हळू देवांना सुद्धा आरक्षण द्यावे लागेल अशी टीका करून देशात केवळ तमाशा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वच आरक्षण ५० टक्क्यात घुसवले तर देशातील ९७ टक्के जनतेला आणि इतर ५० टक्क्यात केवळ ३ टक्के हा न्याय नाही.आरक्षणाच्या माध्यमातून समाजा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने जागृत राहून हा डाव हाणून पाडा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.साठ वर्षाच्या लढ्यानंतर ओबीसी २७ टक्के आरक्षण मिळाले. मात्र ४०० ओबीसी प्रवर्गातील जातींना केवळ १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

सरकार विरोधी बोलणाऱ्यांचे आवाज बंद केला जात आहे. सरकारकडून माध्यमाची मुस्कटदाबी केली जात आहे त्यामुळे ज्या ज्या वेळी आपल्यावर हल्ले होतील त्याला आपल्याला उत्तर द्यावे लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केला. जीएसटी मध्ये कपात म्हणजे पुन्हा एकदा निवडणुकीचे जुमले असून निवडणूतिच्या तोंडावर जनतेत भांडणे लावण्याचे काम केले जाईल त्याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. देशातील विविध संस्था मोडीत काढण्याचा सरकारचा डाव असून न्यायालय तसेच अन्य संस्थामध्ये हस्तक्षेप केला जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख पदी अर्थ तज्ज्ञांची गरज असतांना इतर क्षेत्रातील लोकांना स्थान दिले जात आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे त्यांनी सांगितले.

मांजरपाड्याचे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण होणार असून लवकरच पाणी उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ नये यासाठी कुठलाही महाराष्ट्र विरोधी करार करू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले की, सर्वसमाजाला एकत्र घेऊन माणुसकाही हा धर्म घेऊन ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ हे काम करत आहे. महात्मा फुलेंचे समतेचे कार्य छगन भुजबळ अविरतपणे काम करत आहे. सद्याच्या सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

नगराध्यक्षा शिल्पा परदेशी म्हणाल्या की, आजही बहुजन समाज चाचपडत आहे. संपूर्ण ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम छगन भुजबळ यांनी केले. एकलव्य समाजाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे म्हणाले की, छगन भुजबळ हे ओबीसी दलित उपेक्षितांचे नेते आहेत. गरिबातील गरीब वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केले. मुस्लिम बांधवांची अजाण सुरू झाल्यानंतर समता मेळावा काही काळ थांबविण्यात आला होता.

Previous article…..गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी सभागृह झाले भावूक
Next articleकाकडेंनी भाजपला दिलेल्या सल्ल्यांचे शरद पवारांकडून कौतुक