प्रकाश आंबेडकर यांना कॉंग्रेसचा अकोल्यात “हात” ?
अकोला: भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत असे म्हणणारी कॉंग्रेस येत्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांना पाठिंबा देणार आहे. तसे करून राज्यभरातील दलितांचा पाठिंबा मिळवायचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र आंबेडकरांनी यावर अधिकृत भाष्य केलेले नाही.
आंबेडकरांनी महाआघाडीत यावे, यासाठी कॉंग्रेसने भरपूर प्रयत्न केले. परंतु आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडली नाही. कॉंग्रेसची हीच अट होती की भारिपने एमआयएमची साथ सोडली पाहिजे. परंतु आंबेडकर ठाम असल्याने कॉंग्रेसने हा दुसरा प्रस्ताव ठेवला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळली पाहिजे, ही कॉंग्रेसची भूमिका आहे. म्हणूनच कॉंग्रेसने आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने राज्यभरातील दलितांची मते मिळवता येतील, असे कॉंग्रेसला वाटते.
महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांनी यावे, यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आंबेडकरांना आणण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली होती. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोकसभा जागावाटप अगेदरच पूर्ण झाले आहे, असे आंबेडकर म्हणाले होते.