मी भाजप सोडणार नाही : एकनाथ खडसे
जळगाव: मी भाजपमध्ये नाराज वगैरे नाही. पक्षात नाराज असेल तर अध्यक्षांना सांगेन. मी भाजप सोडणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री खडसे पक्षत्याग करून कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा गेले दोन दिवस सुरू होती. त्या चर्चेला खडसे यांनीच पूर्णविराम दिला आहे.दोन दिवसांपूर्वी लेवा पाटील समाजाचा मेळावा झाला होता. त्यावेळी कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी खडसे यांच्यावर भाजपने खूप अन्याय केला आहे. खडसे यांनी कॉंग्रेसमध्ये यावे, असे वक्तव्य केले.त्यानंतर बोलताना खडसे यांनीही एकाच पक्षाचा शिक्का कुणी लावून राहत नाही, असे सूचक विधान केले होते. त्यामुळेच ही चर्चा सुरू झाली होती.
आज खडसे यांनीच मी भाजपमध्ये नाराज नाही. मी भाजप सोडणार नाही, असे सांगितले. नाराजी पक्षाध्यक्षांना सांगेन, असेही ते म्हणाले.
खडसे नाराज नाहीत असे सांगत असले तरीही ते भाजपमध्ये नाराज असल्याचे बोलले जाते. भोसरी जमिन खरेदी घोटाळ्यात खडसे यांचे मंत्रिपद गेले. जळगावमध्ये खडसे आणि गिरीश महाजन गट यांच्यात हाडवैर असून मुख्यमंत्र्यांनी आपले वजन महाजन यांच्या पारड्यात टाकल्याने खडसे संतप्त आहेत, असेही बोलले जाते. त्यामुळे एकनाथ खडसे आता नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.