ठाकरे चित्रपटाच्या माध्यमातुन भावनिक मत मागण्याचा प्रयत्न : पवार
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक ट्रेलरनंतर चर्चेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने हा चित्रपट आता आणला आहे, अशी टीका केली आहे. ठाकरे चित्रपट प्रदर्शित करून भावनिक मत मागण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे असेही पवार म्हणाले.
ठाकरे चित्रपटाचे निर्माते शिवसेना खासदारच आहेत.त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार, असा आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांनी शिवसेनेसोबत भाजपवरही निशाणा साधला. संजय गांधी निराधार योजनेचे ६०० रूपये देता येत नाहीत तर हे सरकार जाहिरातींवर करोडो रूपये खर्च करू शकते, असा सवाल पवार यांनी केला.
आमदार कपिल पाटील यांनी आघाडीला पाठवलेल्या पत्रासंदर्भात अजित पवार म्हणाले की,कपिल पाटील यांनी पत्र पाठवण्याऐवजी चर्चा करायची होती.समविचारी पक्ष म्हणून एक होण्याचा मनोदय असेल तर सर्व अटी मान्य होतील का, असा सवाल त्यांनी केला.
जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना कुणाच्या मुलाने कुठून निवडणूक लढवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा टोला पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. आठ जागांबाबत कॉंग्रेसशी वाटाघाटी सुरू आहेत, असेही ते म्हणाले.