……आणि आमदार देशमुखांच्या चेंडूवर पंकजाताईंनी मारला षटकार
परळी : राजकारणाच्या मैदानात भल्याभल्यांना नामोहरन करणा-या राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज परळीत झालेल्या सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना जोरदार बॅटींग केली. आ. आर टी देशमुख यांनी टाकलेल्या चेंडूवर त्यांनी षटकार मारला तर आ. लक्ष्मण पवार फलंदाजी करताना आपल्या पहिल्याच बॅालवर पंकजाताई यांनी त्यांना क्लिन बोल्ड केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित भव्य कला व क्रीडा महोत्सवा अंतर्गत तहसील कार्यालया समोरील मैदानात आजपासून सुरू झालेल्या सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते झाले. पंकजाताई मुंडे यांनी नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी मैदानात उतरून बॅटींगही केली. आ. आर टी देशमुख यांनी टाकलेल्या चेंडूवर त्यांनी षटकार मारला तर आ. लक्ष्मण पवार फलंदाजी करताना आपल्या पहिल्याच चेंडूवर पंकजाताई यांनी त्यांना क्लिन बोल्ड केले. हया प्रसंगाचा उल्लेख भाषणात करताच उपस्थितांनीही त्यांना मनमुराद दाद दिली.
आगामी काळात शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा आपला मानस असून त्यासाठी निधी बरोबरच जागाही उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली. भाजपने राज्यभर आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धांमुळे युवकांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, या अगोदरही शहरात गौरी गणेश महोत्सव, टर्निंग पॅाईंटच्या वतीने आपण महिला, युवक व शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देणारे कार्यक्रम हाती घेतले होते. आता मैदानी स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येत आहेत. शहरात क्रीडा स्पर्धेसाठी चांगले वातावरण तयार होत आहे, त्याला अधिक वाव देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा माझा विचार आहे, त्यासाठी लागणा-या जागेचा प्रश्नही आपण सोडवू.