व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा रामदेव बाबांवर निशाणा
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे राजकीय व्यंगचित्रांतून विरोधी पक्षांवर निशाणा साधत असतात. यावेळी मात्र राज ठाकरे यांनी योगगुरू बाबा रामदेव यांना टोला लगावला आहे. पुढील निवडणुकीत पंतप्रधान कोण होईल हे सांगणे कठीण आहे, असे रामदेव म्हणाले होते. त्यावर राज ठाकरे यांनी नेत्रासन केल्याने दृष्टी सुधारते, या वाक्यासह रामदेव यांना दोन्ही बुबुळे दोन दिशांना फाकलेली असे दाखवले आहे. त्यात एकीकडे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
रामदेव बाबांना राज ठाकरे यांनी मोदी प्रशंसक असे लिहिले असून हे आसन केल्याने दृष्टी सुधारते, असे उपहासात्मक भाष्य केले आहे.राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर वारंवार व्यंगचित्रातून उपहासात्मक टीका केली आहे. आता मात्र त्यांनी थेट योगगुरू बाबा रामदेव यांनाच लक्ष्य केले आहे. रामदेव मोदी यांचे पाठीराखे मानले जातात.२०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. पण आता मात्र त्यांनी आपली भूमिका बदलल्याचे दिसत आहे. त्यावरूनच राज यांनी रामदेव यांना टोला लगावला आहे.