नगरमध्ये राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही : संग्राम जगताप

नगरमध्ये राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार नाही : संग्राम जगताप

अहमदनगर: नगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कट्टर विरोधक भाजपला पाठिंबा देऊन भाजपचा महापौर बसवल्याच्या घडामोडीचे राज्यात पडसाद उमटले. भाजपबरोबर जाण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावर टीकेची झोड उठल्यानंतर आज स्थानिक राजकारणाने नवे वळण घेतले आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरमध्ये आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, असे सांगितले.

जगताप म्हणाले की, आम्ही भाजपला विकासासाठी पाठिंबा दिला आहे. पण आम्ही सत्तेत जाणार नाही आणि पालिकेत कोणतेही पद घेणार नाही. आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देणार आहोत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांवर जोरदार टीका झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या विश्वासार्हतेवरच शंका घेतल्या जात आहेत. याचा फटका आपल्याला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, याची कल्पना आल्याने पक्ष बॅकफूटवर गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करत असतात. आता त्यांच्या पक्षाने भाजपला पाठिंबा दिल्याने संपूर्ण पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळेच आता भाजपबरोबर थेट सत्तेत सहभागी व्हायचे नाही, असा राष्ट्रवादीने निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीबद्दल जगताप यांनी आमची भूमिका पक्षाला समजावून सांगू, असे सांगितले.

Previous articleव्यंगचित्रातून राज ठाकरेंचा रामदेव बाबांवर निशाणा
Next articleदुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचा मोफत पास