थर्टी फस्टला मुंबईतील पब्ज,बार आणि हॉटेल्स रात्रभर खुले राहणार
मुंबई: नागरिकांना नववर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे यासाठी राज्यातील अनिवासी भागातील बाजारपेठा रात्रभर खुल्या ठेवाव्यात, अशी मागणी करणारे पत्र युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. ती मान्य करण्यात आली असून ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील पब्ज,बार आणि हॉटेल्स रात्रभर खुले ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे.
मुंबईत लोक नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी रात्रभर फिरणे पसंत करत असतात. पण हॉटेल्स आणि बार १२ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा नियम आहे. यामुळे लोकांना हवे तसे नववर्ष आगमन साजरे करता येत नाही. हे लक्षात घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रात्रभर बाजार खुले ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळे सरकारचेही उत्पन्न वाढेल आणि भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळतील, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.तसेच जे दिवसा कायदेशीर असते ते रात्री बेकायदेशीर कसे काय?असा सवाल केला होता. राज्य सरकारने त्यांच्या म्हणण्याची दखल घेतली आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाईफबद्दलचा प्रस्ताव २०१७ मध्येच विघानसभेत मंजूर झाला. पण तो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पडून आहे, याचीही आठवण करून दिली होती. दरम्यान मुंबईत नववर्ष आगमनाच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ४० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याचे ठरवले आहे.