पंकजा मुंडेंमुळे परळीत रूजली सांस्कृतिक चळवळ

पंकजा मुंडेंमुळे परळीत रूजली सांस्कृतिक चळवळ

परळी : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे शहरातील सांस्कृतिक चळवळीला एक चांगली प्रेरणा मिळाल्याचे चित्र आज दिसून आले. शहर भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतून ‘बेटी बचाव’ चा सामाजिक संदेशही यानिमित्ताने दिला.

भाजपच्या वतीने शहरात सध्या सीएम चषक भव्य कला व क्रीडा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवा अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नुकतेच झाले होते तर आज जिजामाता उद्यानात चित्रकला व वैद्यनाथ महाविद्यालयाच्या बसवेश्वर वसाहती मधील ट्रेकींग ट्रॅकवर धावण्याच्या (रनिंग) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतच्या सुमारे तीन हजार मुलांनी तर धावण्याच्या स्पर्धेत साडे तीनशे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

चित्रकला स्पर्धा तीन गटांमध्ये विभागून घेण्यात आल्या. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आवडेल ते चित्र काढले तर इतरांनी स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण, निसर्गचित्र, जय जवान, जय किसान, जय विज्ञान तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रुण हत्या विषय घेवून बेटी बचाव चा संदेश चित्रातून दिला. धावण्याची स्पर्धा शंभर व चारशे मीटर अशा दोन गटांत घेण्यात आली.

पंकजा मुंडे यांनी शहरात अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थी व युवकांच्या क्रीडा व कला गुणांना वाव तर दिलाच आहे शिवाय शहरात एका चांगल्या संस्कृतीची जोपासना करण्याचे काम केले आहे. क्रिकेट स्पर्धे बरोबरच चित्रकला, रनिंग, रांगोळी, कबड्डी, कुस्ती आणि व्हाॅलीबाॅल याही स्पर्धेचे आयोजन भाजपने केले आहे.

Previous articleनारायण राणे लोकसभा निवडणुक स्वबळावर लढणार !
Next articleथर्टी फर्स्टला ‘भाजप सरकार समारोप’ संध्याचे आयोजन !