नव्या वर्षात विदेशी मद्य महागले

नव्या वर्षात विदेशी मद्य महागले

मुंबई :   राज्य सरकारने देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे विदेशी मद्याच्या किंमती सुमारे १८ ते २० टक्क्यांनी वाढणार आहेत.हे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. या शुल्क वाढीमुळे राज्य सरकारच्या महसुलात ५०० कोटींची भर पडणार आहे.

नव्या वर्षाला निरोप दिल्यानंतर राज्य सरकारने आज तळीरामांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात १८ ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तशी अधिसूचना जारी करण्यात आल्याने आज पासुन विदेशी मद्य महाग झाले आहे. राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबरोबरच विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर सध्या मोठा भार पडला आहे. त्यामुळेच महसुल वाढीसाठी देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. या नव्या दरांची अंमलबजावणी आज १ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचा डिसेंबर २०१८ पर्यंत ८ हजार ९१५ कोटी एवढा महसुल होता तर या वर्षीचा महसुल १४ हजार ३४३ कोटीवर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आजच्या या निर्णयामुळे देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्यापैकी रॅायल स्टॅग, सिंग्नेचर, वोडका २० टक्क्यांनी तर ब्लेंडर स्प्राईड १८ ते २० टक्क्यांनी महागणार आहे तर भारतात तयार होणारी स्कॅाच २१ टक्क्यांनी महागली आहे.

 दरम्यान काल सरत्या वर्षाला निरोप देत असताना मुंबईत दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या ४५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत वाहने चालवणा-या चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. त्यांचा वाहनचालक परवानादेखील जप्त करण्यात आला. काल रात्री ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत १ हजार ५३३ वाहन चालकांना पकडण्यात आले. यातील ७६ जण मद्यधुंद अवस्थेत होते.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाः खा. अशोक चव्हाण
Next articleव्हिडिओ गेम छोडो, मैदान से नाता जोडो : विनोद तावडे