मोदींची मुलाखत सेटिंग होती : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांची टीका
मुंबई:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेली मुलाखत म्हणजे तरूणांच्या भाषेत सांगायचे तर सेटिंग होती. ही फिक्स्ड मॅच होती, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
मोदी यांनी आपल्या दीर्घ मुलाखतीत राम मंदिर, राफेल, शबरीमाला, नोटबंदी,जीएसटी आदी विविध मुद्यांवर उत्तरे दिली. पण विरोधकांनी मात्र या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. आव्हाड यांनी तर ही मुलाखत सेटिंग होती, असा आरोप केला.मोदींची मुलाखत ही पत्रकार परिषद नव्हती तर फिक्स्ड मॅच होती. तसेच ही मुलाखत म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्याकडूनच प्रश्नपत्रिका सेट करून घ्यायची आणि मग विद्यार्थी शंभर पैकी शंभर मार्क मिळाले म्हणूम सेलेब्रेशन करणार, अशी जोरदार खिल्ली आव्हाड यांनी उडवली आहे.
आव्हाड यांनी ट्विट केले आहे की,गेल्या साडेचार वर्षांत एकही मुलाखत न देता निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी मुलाखत देणे हे त्यांच्या मानसिक पराभवाचे द्योतक आहे.
लहानपणी एक मुलगा बॅट आणि बॉल घेऊन यायचा. त्याला आवडेल त्याला बोलिंग करायला लावायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा. बॅटिंग मात्र तो स्वत:च करायचा, अशा शब्दांत आव्हाड यांनी टोला लगावला आहे.