शेतकरी कुठे सक्षम झालाय? पवार

शेतकरी कुठे सक्षम झालाय?

अजित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे:गेल्या चार वर्षात आम्ही शेतकऱ्यांसाठी इतके काम केले आहे की, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज उरलेली नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला. त्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना अच्छे दिन चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या कथनी और करनीमधील फरक यातूनच दिसतो, असा टोला पवारांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काल दिलेल्या मुलाखतीत नीम अवगुंठित युरिया, मृद् आरोग्य कार्ड,एफआरपी यामुळे शेतकरी सक्षम झाल्याचा दावा केला होता. त्यावर अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,कांदा किलोला अगदीच कमी भाव मिळाल्यामुळे रस्त्यावर फेकावा लागत आहे.पिकाला हमी भाव मिळत नाही. मग शेतकरी कुठे सक्षम झालाय? असा सवाल पवार यांनी केला आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचे ढोल का पिटत आहेत, असेही अजित पवार यांनी विचारले आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळत नाही. कांदा उत्पादकांनी कांदा विकून आलेली तुटपुंजी रक्कम उद्वेगाने पंतप्रधान कार्यालयाला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. शेतकरी रोजच आत्महत्या करत आहेत. तरीही शेतकरी सक्षम झाल्याचा दावा पंतप्रधान करत असल्याबद्दल अजित पवार यांनी संताप ट्विटमधून व्यक्त केला आहे.

Previous articleराज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?
Next articleचंद्रकांत पाटील यांनी आघाडीची चिंता करू नये