चंद्रकांत पाटील यांनी आघाडीची चिंता करू नये

चंद्रकांत पाटील यांनी आघाडीची चिंता करू नये

राधाकृष्ण विखे पाटील यांचे उत्तर

अहमदनगर: निवडणूक जशी जवळ येत आहे तसे भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातील कलगीतुरा जोरात सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काल सांगलीत बोलताना कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र लढावे. मग कुणाची ताकद किती आहे, हे कळेल, असे आव्हान दिले होते. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. पाटील यांनी आघाडीची चिंता करू नये, असे ते म्हणाले.

भाजपने स्वत:चे पहावे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची चिंता करू नये. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी निवडणूक एकत्रितपणेच लढवणार आहेत. २०१९ मध्ये राज्यात आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपवर विखे यांनी घणाघाती टीका केली. भाजपने सोशल मीडियाचा वापर करून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांना आताच पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे ते अशी आव्हाने देत आहेत, अशी जोरदार टीका विखे पाटील यांनी केली.

पाटील यांनी शिवसेनेलाही स्वतंत्र लढण्याचे आव्हान दिले होते. मात्र शिवसेनेने पाटील यांना उत्तर अजून तरी दिलेले नाही.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तर मतांची विभागणी होऊन भाजपचा पराभव होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. चंद्रकांत पाटील यांनी या शक्यतेमुळेच दोन्ही पक्षांना आव्हान देऊन डिवचले आहे.

Previous articleशेतकरी कुठे सक्षम झालाय? पवार
Next articleमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : शरद पवार