वीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा अन्यथा वेतनवाढी रोखणार : ऊर्जा मंत्री
मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडळ झोनच्या सर्व विभागातील वीज वितरण हानी येत्या महिन्याभरात ५ टक्के पर्यंत आणा, अन्यथा कर्मचारी अभियंतांच्या तीन वेतन वाढी गोठवण्याचा इशारा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला.
भांडूप येथे ग्राहकांना मिळणा-या सेवा आणि तक्रारींबाबत अढावा बैठक ऊर्जामंत्र्यांनी आज घेतली. या बैठकीत ग्राहकांना मिळणा-या सर्व सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे तसेच लघुदाब ग्राहकांचे वीज कनेक्शन महिन्याभरात पूर्ण करण्यावरही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी भर दिला. सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक ग्राहक असलेल्या भांडूप परिमंडळात १० टक्के वीज वितरण हानी आहे. ही हानी ५ टक्क्यांवर आली पाहीजे. एकही कृषिपंप कनेक्शन नसताना ऐवढी हानी नको, वीज वितरण हानी ही तीन टक्क्यांपर्यंत आणण्याचे प्रयत्न करावे. असेही ऊर्जामंत्री म्हणाले.
वीज हानीचा सर्वकश आढावा घेताना ठाणे, कळवा, मुंब्रा, येथे सर्वाधिक हानीचे आकडे समोर आले. ज्या ठिकाणी १० टक्के हानी आहे तेथे ५ टक्के, ज्या ठिकाणी ५ टक्के वितरण हानी आहे तेथे तीन टक्क्यांवर प्रमाण आले पाहिजे. या बैठकीत सौभाग्य योजनेतील सर्व कनेक्शन पूर्ण असल्याची माहितीही सांगण्यात आली. ज्या भागात महावितरणची वीज अजून पोहचली नाही तेथे यंत्रणा कधी पोहचणार याचे नियोजन करुन शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
आय.पी.डी.एस. भाग एकचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून भाग दोन मधील ६० टक्के कामे झाली आहेत. दीनदयाल योजनेत १२० कोटींची कामे झाली असून उर्वरीत कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षात ज्या अधिकाऱ्यांनी दिलेला निधी खर्च केला नाही त्या संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली जाईल. भांडूप परिमंडळात २५० कोटींची कामे सुरु असल्याचेही माहिती या बैठकीत देण्यात आली.वीज कनेक्शनसाठी अर्जाची संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन करण्यात यावी. सर्कल ते डिव्हीजनमधील कनेक्शनची प्रक्रीया ७ दिवसात पूर्ण व्हावी. कनेक्शनसाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयात येण्याची गरज नाही, असे निर्देश देताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल जिपीएस सिस्टम सुरु ठेवण्याच्या सुचनाही दिल्या.
उच्चदाब व लघुदाब ग्राहकांचे प्रलंबित कनेक्शन कश्यामुळे आहेत याची कारणे सांगा. कनेक्शनसाठी आवश्यक असलेली सर्व कामे झाल्याशिवाय कनेक्शनचे अर्ज स्विकारु नका, असे निर्देश देताना ऊर्जामंत्री म्हणाले मिटर मिळत नसल्याच्या तक्रारी आमच्या कडे आल्या आहेत. मिटर नाही म्हणून कनेक्शन नाही अशी स्थिती नको महिनाभरात सर्व पेड पेन्डीग कनेक्शन पूर्ण झाले पाहिजे.फक्त उच्चदाब ग्राहकांचे मिटर टेस्टिंग केल्या जातात, लघुदाब ग्राहकांचे मिटर टेस्टिंग होत नसत्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मिटर टेस्टिंग विभागाची प्रक्रियाही ऑनलाईन नाही.ग्राहकांशी संबंध येत असलेल्या सर्व सेवा ऑनलाईन करा. तांत्रिक मंजुरीची प्रक्रियाही ऑनलाईन पध्दतीने करा.
भांडूप झोन मधील २४ लाख ग्राहकांनपैकी फक्त ९ लाख ५५ हजार ग्राहकांकडे मोबाईल ॲप आहे. येत्या 31 मार्च पर्यंत सर्व ग्राहक मोबाईल ॲपने जोडले जाण्याच्या सुचना देताना ऊर्जामंत्री म्हणाले फीडर ट्रीपींगला प्रशासकीय कार्यवाहीशी जोडण्यात यावे. वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ५०० कोटींची योजना तयार करावी. भांडूप झोन मधील वाडया वस्त्यांनमध्ये सोलरपंपाची मागणी असल्यास त्याची यादी तयार करा. ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयाची वीजेची मागणी लक्षात घेऊन त्या कार्यलयांस सौरऊर्जेची वीज देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.