लोकसभा निवडणूकीपूर्वी हे दोन नेते कॉंग्रेसच्या गळाला?

मुंबई नगरी टीम

मुंबई:  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे कॉंग्रेसच्या गळाला लागण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.संजय काकडे दररोज पक्षाच्या विरोधात आक्रमक विधाने करून भाजपला अपशकून करत आहेत,असे बोलले जाते.

कॉंग्रेस संजय काकडे यांना पुण्यातून लोकसभेसाठी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. काकडे यांनी तसे जोमाने प्रयत्न सुरू आहेत.तर नारायण राणेंनी सध्या भाजपशी जुळवून घेतले असले तरीही शिवसेनेशी युतीसाठी भाजप त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची शक्यता आहे.त्यामुळे राणे अस्वस्थ असून राणेंना पुन्हा आपल्याकडे घेऊन कोकणातून लोकसभेची उमेदवारी देवू शकतात अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकी पूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉंग्रेस सोडून गेलेल्या राणेंना पुन्हा पक्षात आणण्यासाठी एका मोठ्या कॉंग्रेस नेत्याने मध्यस्थी केली असल्याची चर्चा आहे. राणे सध्या भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत त्यांना भाजपने  जाहीरनामा समितीत स्थान दिले असले तरीही भाजप शिवसेना युती होऊ शकते.तसे झाले तर भाजप राणेंचा पत्ता कट करणार,हे उघड आहे.कारण राणे आणि शिवसेना यांचे हाडवैर आहे.त्यामुळे राणे कॉंग्रेसमध्ये परत येण्याचा विचार करू शकतात.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी कॉंग्रेसकडे राणेंइतका तुल्यबळ नेताच नाही.

दुसरीकडे संजय काकडे यांना भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे.परंतु भाजप त्यांना ती देण्याची शक्यता नाही.त्यामुळे काकडे रोज भाजपला अडचणीत आणणारी विधाने करत आहेत.कॉंग्रेस मात्र काकडेंना आपल्याकडे घेऊन पुण्यातील उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात आहे.कलमाडी  यांना पुन्हा पुण्यातून उमेदवारी देण्याचा कॉंग्रेसचा विचार नाही.कॉंग्रेसला आयात केलेला का असेना पण नवा चेहरा हवा आहे.

Previous articleसरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा डान्स बार महत्वाचा : राजू शेट्टी
Next articleआता रेल्वेने दिल्लीला पोहचा अवघ्या १९ तासात