मुंबई नगरी टीम
सावंतवाडी : गेल्या साडेचार वर्षात केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून कोकणातल्या पावसापेक्षा जास्त मोठा घोषणांचा पाऊस पाडला जाईल मात्र भाजपवाल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका या खोटारड्या, जुमलेबाज सरकारला सत्तेवरून पायउतार करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या टप्प्याच्या शुभारंभाच्या सभेत बोलत होते.भाजप शिवसेना सरकारने गेल्या साडेचार वर्षात राज्याचे वाटोळे केले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकत्र सत्तेत बसून राज्याला लुटले आहे. हे दिवसा एकमेकांना शिव्या घालतात व रात्री बसून जनतेला कसे लुटायचे ते ठरवतात. भाजप शिवसेनेचे रात्रीस खेळ चाले सुरु आहे. काँग्रेस सरकारने कोकणाच्या विकासासाठी अनेक योजना सुरु केल्या प्रकल्प आणले पण युती सरकारच्या काळात विकासाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. नाणार रिफायनरी सारखे विनाशकारी प्रकल्प आणून कोकणाला उद्धवस्त करण्याचे काम भाजप शिवसेनेने सुरु केले आहे. नाणारबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
टँकर आणि चारा छावण्या सुरु करा अशी मागणी राज्यातील जनता करते आहे. पण सरकारने डान्सबार आणि लावण्या सुरु केल्या. सरकारला दुष्काळाचे चटके सहन करणा-या जनतेपेक्षा डान्सबारवाल्यांची जास्त काळजी आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. मुख्यमंत्री सरकार चालवण्यात नापास झाले आहेत. युती सरकार कोकणाच्या विकासासाठी निधी देत नाही. अली बाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीप्रमाणे सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या टोळ्या कोकणाची लूट करत आहेत. कोकण वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेचे भ्रष्ट सरकार हद्दपार करून काँग्रेसचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.