नारायणगडाचा विकास नातीकडून व्हावा ही नगद नारायणांचीच इच्छा : पंकजा मुंडे 

मुंबई नगरी टीम

बीड : कोणतेही काम मी श्रेय घेण्यासाठी करत नाही, नारायण गडाचा विकास माझ्या हातून व्हावा ही नगद नारायणांचीच इच्छा होती म्हणूनच पालकमंत्री या नात्याने मी या तीर्थक्षेत्राकरिता भरभरून निधी देवू शकले, या गडाची मी नात आहे, हे माझे भाग्यच आहे असे प्रतिपादन शब्दांत  राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी येथे केले.

श्रीक्षेत्र नारायणगड तीर्थक्षेत्राच्या विविध विकास कामांचा आढावा आणि नवगण राजुरी ते साक्षाळ पिंपरी या नारायणगड मार्गे जाणा-या ३ कोटी रुपयांच्या रस्ता कामाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते नारायणगड येथे झाला. महंत शिवाजी महाराजांच्या साक्षीने गडावर चांगल्या कामाची सुरवात झाली आहे. मी या गडाची नात आहे, या नात्याने त्यांच्या निमंत्रणावरून मी येथे आले. मी गडाच्या विकास कामासाठी २५ कोटीचा निधी दिला, रस्त्यासाठी निधी दिला असे असले तरी श्रेयासाठी मी कधीच काम करत नाही. लोकनेते मुंडे साहेबांची आठवण आज येते कारण त्यांच्या लोकसभेचा अर्ज नगद नारायणांचे दर्शन घेवून आम्ही भरला होता. त्यांनी गडासाठी जो शब्द दिला होता तो मी पाळला. राजकारणाचे जोडे गडाच्या बाहेर असले पाहिजेत अशी शिकवण आमच्या संस्काराची आहे.  कोणत्याही गडावरून आम्ही कधी राजकारण केलं नाही. अहिंसा व प्रेमाची शिकवण संतांनी समाजाला दिली त्याचा आदर्श सर्वानी घ्यावा असे त्या म्हणाल्या. व्यासपीठावर बसलेले नेते विविध राजकीय पक्षांशी संबंधित आहेत पण जिल्हयाच्या विकासासाठी आम्ही सर्वानी एकत्रित येवून काम केले पण काहींना हे जमत नाही त्याला काय करणार? आमच्या जिल्हयात येवून गलिच्छ राजकारण करणारांना हा संदेश असल्याचे त्या म्हणाल्या. चांगल्या माणसांना एकत्र आणून जिल्हयाची प्रगती करायची आहे फक्त आपल्या आशीर्वादाची थाप पाठीवर असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गडावर पोहोचताच  पंकजा मुंडे, खा.  प्रितम मुंडे यांनी नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गडावरील विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी जयदत्त क्षीरसागर व अन्य नेते उपस्थित होते. २५ कोटी रूपयांपैकी ३ कोटी रुपयांचा निधी नुकताच नारायणगडाला वर्ग करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. गोपालनाचे उत्कृष्ट काम करणारे शिरूर कासारचे गोरक्षक सय्यद शब्बीर यांना पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी  पंकजा मुंडे यांच्या सत्कार करण्यात आला. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शब्बीर यांनी केलेल्या कामाचे  त्यांनी कौतुक केले.  शब्बीर यांना सन्मान स्विकारण्यासाठी माझ्या खर्चाने मी त्यांना दिल्लीला पाठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleमुख्यमंत्री… उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका: मुंडे
Next articleमहानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांच्या मानधनात ६ हजार रूपये वाढ