सरकारने दुष्काळग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसलीः खा. अशोक चव्हाण

मुंबई नगरी टीम

 मुंबई :  केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचेच सरकार असताना दुष्काळासाठी राज्य सरकारने मागितलेली पूर्ण मदत राज्याला मिळत नाही. हे राज्य सरकारचे अपयश असून केंद्र सरकारचा महाराष्ट्राबद्दल असणारा आकस दर्शवणारे आहे. केंद्र सरकारने आज जाहीर केलेली मदत हा चुनावी जुमला आहे अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की,  दुष्काळाने होरपळा-या महाराष्ट्राला केंद्र सरकारने ७९६२ कोटी रूपयांची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केली होती. पण केंद्र सरकारने फक्त ४७१४ कोटी रूपयांचीच मदत केली आहे. आपण मागितलेली संपूर्ण मदतही राज्य सरकार आपल्या पदरात पाडून घेऊ शकलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. दुष्काळ हाताळण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, खरीपा पाठोपाठ रब्बीही वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची आवश्यकता आहे  पण सरकार घोषणांपलिकडे काही करत नाही.  केंद्रात महाराष्ट्र सरकारची पत नाही व महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची केंद्र सरकारची मानसिकता नाही, हे यातून स्पष्ट  दिसून येत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous articleदुष्काळी मदतीत केंद्राचा महाराष्ट्रातील शेतक-यांवर  अन्याय! : विखे पाटील
Next articleआता मुख्यमंत्री पद येणार लोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत