मुंबई नगरी टीम
सोलापूर: सोलापूर लोकसभा जागेचा भलताच गुंता भाजपसमोर निर्माण झाला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना भाजपमध्ये घेऊन पवारांना धक्का भाजपने दिला खरा.पण आता विद्यमान खासदार शरद बनसोडे नाराज झाले आहेत.त्यांनी बंडाचे निशाण फडकवले असून ढोबळे किंवा अमरसाबळे यांना सोलापूरमधून भाजपने उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीत जाणार असल्याचा इशाराच दिला आहे.
सोलापुरातून ढोबळे यांना लोकसभेसाठी तिकीट हवे आहे.ते माजी मंत्री असून त्यांचे वजनही आहे.भाजपमधून सोलापूरसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी अमर साबळे यांचे प्रयत्नही सुरू आहेत.तसे झाले तर बनसोडे पक्ष सोडणार आहेत.सोलापूरमधून कॉंग्रेसतर्फे बारा वेळा निवडून आलेले सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.इतक्या दिग्गज उमेदवाराशी लढत देताना भाजपमध्येच जर एकवाक्यता नसेल तर निकाल ठरलेलाच आहे.मात्र लोकसभेला तिकीट न मिळाल्यास ढोबळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.
खासदार बनसोडे यांच्याबद्दल मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जाते.आमदार प्रणिती शिंदे यांनी तर बनसोडे यांच्यावर जहरी टीका केली होती.बनसोडे यांनी मतदारसंघात काहीच कामे केली नाहीत,असा आरोप लोकच करत आहेत.त्यामुळे भाजपही त्यांना तिकीट देण्याबाबत फेरविचार करत असल्याची चर्चा आहे.मात्र बनसोडे राष्ट्रवादीत गेले तर त्यांचे स्वागत केले जाईल.पण बनसोडे यांचा फारसा फायदा आघाडीला होणार नाही,असेही बोलले जाते.