यापुढे शिवसेनेशी राज्य पातळीवरील नेतेच चर्चा करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपकडून शिवसेनेची मनधरणी भरपूर करून झाली असून यापुढे भाजपचा कोणताही केंद्रीय पातळीवरचा नेता उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार नाही,असे ठरवले असल्याचे समजते. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच फक्त बोलणी करतील,असे ठरवण्यात आले आहे.

काल फडणवीस युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.पण ते रिकाम्या हाताने परतले.यानंतर आता राज्यस्तरावरचे नेतेच चर्चा करणार आहेत. यापूर्वी अमित शहा मातोश्रीवर चर्चा करून गेले. त्यावेळी दानवे यांना बाहेर बसविण्यात आले होते. तो अपमान भाजप विसरलेला नसल्याने आता दानवे हेच चर्चा करतील. भाजप शिवसेना यांच्यामध्ये आता युतीची घोषणा कोणत्याहीक्षणी होईल, असे वातावरण तयार झाले होते. पण पुलवामा हल्ल्यामुळे चर्चा आटोपती घेण्यात आल्याचे सांगितले गेले. पण भाजपला शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अट मान्य नसल्याने चर्चा फिसकटल्याचे सांगण्यात येते. दहशतवादी हल्ल्यामुळे केंद्रीय नेते दिल्लीतच गुंतलेले राहणार आहेत.भाजप शिवसेना युतीचे भिजत घोंगडे आणखी काही काळ तसेच राहील, अशी चर्चा आहे.

Previous articleपाकिस्तानचा एकदाच सोक्षमोक्ष लावा : उध्दव ठाकरे
Next articleदुस-या टप्प्यातील १ हजार ४५४ कोटींचा दुष्काळी निधी वितरीत