आघाडीत मनसेला “नो एंट्री”
मुंबई नगरी टीम
मुंबई : मतविभाजन टाळण्यासाठी मनसेला आघाडीमध्ये घेण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे काँग्रेसने उधळून लावले आहेत. मनसेला आघाडीमध्ये घेता येणार नाही,अशा स्पष्ट शब्दांत काँग्रेसने नकार कळवला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला आघाडीत घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले आहेत.
मनसेला आघाडीत घेण्यासाठी अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मनसेबरोबर वैचारिक मतभेद आहेत. समविचारी पक्ष महाआघाडीत आहेत. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही,असे काँग्रेसने स्पष्ट कळविले आहे. त्यामुळे मनसे आता एकाकी पडला आहे.मनसेला आघाडीत स्थान नसल्याचे राष्ट्रवादीला स्पष्टपणे कळवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले की,समविचारी पक्षांची आघाडी स्थापन झाली असून, मनसे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही.काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि मनसे यांची जवळीक वाढली होती. शरद पवार यांची राज ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत,एकत्र केलेला विमान प्रवास यासह इतरही घडामोडीमुळे मनसेला आघाडीमध्ये स्थान दिले जाईल,अशी चर्चा होती.परंतु मनसेला स्थान दिल्यास काँग्रेसच्या परप्रांतीयांच्या मतांवर परिणाम होईल,अशी भीती काँग्रेसला वाटते.