मावळमधून आबांची कन्या निवडणूक रिंगणात ?
मुंबई नगरी टीम
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीवर पुन्हा उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी येथे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचे नाव चर्चेत होते. त्यांनी भेटीगाठी सुरू करून कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरूवात केली होती. पण खुद्द आजोबांनी नातवाच्या नावावर काट मारली.त्यामुळे आता राष्ट्रवादीने दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील तथा आबांची कन्या स्मिता पाटील यांच्याकडे उमेदवारीबाबत विचारणा केल्याचे समजते.अर्थात स्मिता पाटील यांनी अजून आपला निर्णय जाहीर केला नाही.
मावळमध्ये राष्ट्रवादीचा सामना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी होऊ शकतो. पार्थ पवार यांची चर्चा जोरात होती. त्यांचे पोस्टर लागले होते. मात्र शरद पवारांनी पार्थच्या नावावर काट मारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी नेत्यांनी स्मिता पाटील यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.मावळमध्ये मोठ्या संख्येने डान्सबार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सरकारने डान्सबार प्रकरणात नीट बाजू न मांडल्याने ते सुरू झाले,अशी लोकभावना आहे. आबांनी डान्सबार बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तसेच डान्सबार पुन्हा सुरू झाल्यावर स्मिता पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. यामुळे स्मिता पाटील यांच्या भूमिकेचा राष्ट्रवादीला मावळमध्ये फायदा होऊ शकतो,असे गणित यामागे आहे.
पनवेल आणि परिसरात डान्सबार भरपूर असल्याने हे डान्सबार बंद करण्याची हिंमत दाखवणार्या आबांबद्दल लोकांच्या मनात आदर आणि सहानुभूती आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला स्मिता पाटील यांच्या उमेदवारीने होऊ शकतो. स्मिता पाटील यांच्याबद्दल मावळ भागात मोठ्या प्रमाणावर सहानुभूती आहे. या सर्व कारणांमुळे स्मिता पाटील बाजी मारू शकतील,असा राष्ट्रवादीचा होरा आहे. आबांबद्दल असलेली चांगुलपणाची भावनाही स्मिता पाटील यांना मदत करण्याची शक्यता आहे.पार्थ पवार यांच्याबाबतच्या चर्चा मात्र आता पूर्णपणे बंद झाल्या आहेत.