९२ वर्षाचा असलो तरीही रावसाहेब दानवेंविरोधात लढेन
मुंबई नगरी टीम
जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात त्यांचे राजकीय गुरू पुंडलिकराव दानवे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मी ९२वर्षाचा असलो तरीही रावसाहेब दानवे यांच्याविरूद्ध लढण्यास तयार आहे. फक्त राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवारांनी आदेश द्यावा,असे पुंडलिकराव दानवे यांनी म्हटले आहे.
पुंडलिकराव दानवे हे रावसाहेब दानवे यांचे राजकीय गुरू आहेत. पण आता रावसाहेब यांना शिष्य म्हणायला लाज वाटते,असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रावसाहेब आणि माझ्यातील लढाई ही राम रावण यांच्यातील लढाई असेल,असा टोला लगावला.संसदेच्या इमारतीला पिलर किती याचे उत्तर रावसाहेब यांनी दिल्यास त्यांच्याविरोधात काम करणे सोडून देईन,असेही ते म्हणाले.पुंडलिकराव दानवे हे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असून १९७७मध्ये ते जनता दलातर्फे खासदार म्हणून निवडून आले होते. नंतर ते भाजपच्या तिकीटावर चार वेळा निवडणूक लढले पण एकदाच जिंकले.
पुंडलिकराव दानवे यांना तिकीट मिळण्याची शक्यता नाही आणि ते निवडणूक लढणार नाहीत. पण त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या विजयाची वाट अवघड केली आहे. आजही पुंडलिकराव दानवे यांना मानणारा जुना मतदार आहे. त्याच्यावर परिणाम होऊ शकतो.शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.